मुले चोरी का करतात ?
“प्रकाश, डॉक्टरांना सांग तू का चोरी केलीस, का घेतलेस पैसे बाबांच्या खिशातून ?” प्रकाशच्या आईने दरडावून प्रकाशला विचारलं.
दहा वर्षाचा प्रकाश खुर्चीत माझ्यापुढे थंड चेहऱ्याने बसला होता. आईच्या या वाक्याने त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि चेहरा रागाने लालबुंद झाला. प्रकाशला केबिन बाहेर पाठवून मी त्याच्या आईवडिलांकडून त्याची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
“डॉक्टर, आम्ही दोघेही नोकरी करतो. दोघांना चांगला हुद्दा, चांगला पगार आहे. घरात काही कमी नाही. प्रकाशला तर आम्ही सगळे आणून देतो, पण आम्ही दोघेही शिस्तप्रिय आहोत. ह्यांना तर खोटेपणाची फार चिड आहे आणि नेमका आमचाच मुलगा चोर निपजला.
पूर्वी प्रकाश कधीतरी खोटं बोलायचा. गृहपाठावरून, परीक्षेतल्या मार्कावरून थापा मारायचा तेव्हाच, आम्ही त्याला कडक शिक्षा केली. त्याला असं मारलं की, पुन्हा त्याची जीभ खोटं बोलायला धजावणारच नाही, पण हल्ली तो घरातले पैसे नेतो. शाळेतूनही दोनदा पैसे घेतले आणि मग कधी मित्रांना हॉटेलात ने, कधी चॉकलेट खा, कधी वस्तू आण असे खर्च करतो. आमच्या हे लक्षात आलं तेव्हा त्याला आम्ही दोन दिवस उपाशी ठेवलं, पण काही उपयोग झाला नाही मारून, कोंडून, तापत्या पळीने चटका देऊन, सगळे उपाय करून झाले, पण काय उपयोग झाला नाही.”
मला जाणवलं की प्रकाशाच्या पालकांकडे शिस्तीचा अतिरेक आणि प्रेमाचा अभाव होता. प्रकाशच्या वयाला अनुसरून त्याच्या वागणुकीचा विचार करण्यापेक्षा कडक उपायांनी त्याला सरळ करण्याकडे त्यांचा कल होता.
मुलांमध्ये खोटं बोलणं, चोरी करणे अशा प्रवृत्ती आढळून आल्या, तर साहजिकच पालक धास्तावतात. आपल्या घरात हा गुन्हेगार कसा जन्माला आला ?, या विचाराने त्या गुन्हेगाराला सुधारण्यासाठी त्वरित उपाय योजना सुरू करतात.
खरंतर खोटं बोलणं, चोरी करणं, यासारख्या समस्यांमध्ये मुलांच्या वयाचा, त्यांच्या भोवतालच्या वातावरणाचा विचार करणं फार महत्वाचं असतं.
वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापर्यंत मुलांना ही वस्तू आपली, ही दुसऱ्याची अशी जाणीव नसते. म्हणून अजाणतेपणे कधी कधी या बालव्यात मुलं एखाद्याची वस्तू घरी आणतात. अशावेळी या गोष्टीचा बाऊ न करता या घटनेचा फायदा घेऊन पालकांनी मुलांना वस्तू दुसऱ्याची असतानाही ती न घेणं किंवा परत करणं याविषयी त्यांच्या वयाला अनुसरून माहिती देणे आवश्यक असतं. तुझी बाहुली कोणी न विचारता घेतली तर तुला आवडेल का ? किंवा तुझी पेन्सिल तुझ्या नकळत कुणी घेऊन वापरली, तर तुला कसं वाटेल ? अशा प्रकारे सोप्या उदाहरणांनी मुलाला आपला मुद्दा पटवून देता येतो.
- एखाद्याची एखादी वस्तू आपल्याला कितीही आवडली, तरी ती आपण घेऊ शकत नाही, ही गोष्ट मुलांच्या मनावर ठसवणं महत्त्वाचं ठरतं.
- कधी कधी छोटी मुलं, स्वतः मधल्या “स्व” ला खुश करण्यासाठी ही पटकन कोणाची वस्तू घेतात.
- एखाद्याला आपल्या बाबांसारख तो व्हावसं वाटत, म्हणून ते बाबांचं घड्याळ हातात घालून मिरवतो, एखादी पिटुकली आईची सोन्याची बांगडी खेळायला घेते. अशा वेळी मुलांना फक्त प्रेमाने समजून सांगायची गरज असते.
साधारण सहा ते सात वर्ष वयामध्ये मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची व्यवस्थित कल्पना येते. इतरांच्या नकळत एखादी वस्तू घेणे हे चूक आहे, हे या वयात मुलांना व्यवस्थित कळायला लागते.
तरीही मग मुलं चोरी का करतात, तरी यामध्ये खालील कारण असू शकतात . —
1. मुलांना स्वतःबद्दल कधी कधी खूप कमीपणा वाटतो. ती कमतरता भरून काढण्यासाठी मग आपल्याकडे एखादी किमती वस्तू वा पैसे आहेत, आपण हे कोणीतरी आहोत असं दाखवण्याचा दुबळा प्रयत्न मुलं करतात.
2. कधी कधी समवयस्क मुलांच्या दबावाला बळी पडून व त्यांच्यामध्ये आपण सामावलं जावं या आशेने मुलं चोरी करून स्मार्ट बनण्याचा किंवा मित्रांना हॉटेलवर नेऊन त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात.
3. काही वेळा पालकांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होतयं अशी भावना मुलांच्या मनात असते. मुलं आणि त्यांचे आई-वडील यात भावनिक जवळीक नसेल, तर आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठीही मुलं चोरी करण्यास उद्युक्त होतं; तर कधी कधी भावनिक व मानसिक पातळीवर जेव्हा प्रेम आणि आपलेपणा मिळत नाही, तेव्हा त्या पोकळीला भरून काढण्यासाठीच जणू मुल इतरांच्या वस्तू चोरतं.
आता आपल्या लक्षात येईल की, बऱ्याचदा चोरी करण्यामागे मुलांच्या मानसिक गरजा पूर्ण न होणं, हे मूळ कारण असू शकतं, त्यामुळे मुलांना खूप रागावणं, त्यांची चोर- दरोडेखोर अशा शब्दांनी हेटाळणी करणं, त्यांना कडक शिक्षा करणं या सगळ्यांनी समस्या सुटण्यापेक्षा वाढण्याची शक्यता अधिक असते.
पालकांनी समस्या कशी हाताळवी ?
-
मुलांना शिस्त लावताना त्यांच्यावर संस्कार करताना किंवा त्यांचे व्यक्तिमत्व घडवताना प्रेम, सुरक्षितता, स्थैर्य या मुलांच्या मानसिक गरजा तर डावल्या जात नाहीत ना, याचे भान पालकांनी सतत ठेवायला हवं.
-
मुलांनी चूक केल्यास त्यांच्या चुकीला पाठीशी घालू नका, पण वाईट वागणुकीमुळे मूल वाईट नाही ध्यानात ठेवा.
-
वाईट वागणुकीचा तिरस्कार करा, मुलाचा नको.
-
जेव्हा मुलाला चोरीची सवय लागली असेल व आपलं मूल चुकतयं असं वाटत असेल तर तज्ञ समुपदेशकाचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते.
होमिओपॅथीमध्ये या समस्येवर अतिशय गुणकारी औषध आहेत.
अर्थातच ती तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने घेणेच योग्य ठरतं.