पौगंडावस्था व होमिओपॅथी
14 वर्षाच्या आदितीस प्रश्न पडला, “माझ्या शारीरिक रचनेत होत असलेले बदल आणि समवयस्क तरुणांविषयी मला वाटणारे आकर्षण माझ्यासाठी कुतूहल आणि चिंतेचा विषय आहे.
शरीर रचनेत होणाऱ्या बदलांविषयी सविस्तर जाणून घेण्याची माझी इच्छा आहे, पण घरातील व्यक्ती विशेषतः आई प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असते.”
पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, टी.व्ही.वाहिन्यांवरून दाखविण्यात येणारी अश्लीलता यामुळे मनात नाना-विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ” जवान हुं, नादान नही |” टी.व्ही.च्या जाहिरातीतील अर्थ कळतो, पण याविषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा आहे.
लैंगिक विषयावर हा प्रश्न केवळ आदितीच्या मनात उपस्थित झालेला नाही, तर या वयात पदार्पण करणाऱ्या बहुतेक सर्वच मुलींच्या मनात उपस्थित झालेला आहे.
अगदी काहीच मुलींना त्यांच्या घरातील मंडळींकडून समाधानकारक उत्तरे मिळत असतात. पण आजच्या वैज्ञानिक युगात या विषयावर खुल्या मनाने चर्चा करणे जिथे हीन अभिरुची मानली जाते आणि या विषयावरील पुस्तके वाचणे, लिहिणे, बोलणे नीती भ्रष्टता मानली जाते, तिथे या असंख्य मुलींच्या मनातील प्रश्नांची उत्तरे कुठून मिळणार ?
विज्ञान युगातील आमची संकुचित मानसिकता यासाठी कारणीभूत नाही काय?
किशोर अवस्थेत मुलांमध्ये होणारे अंतर्गत आणि बाह्य बदल त्यांच्यात भावनिक विकासही घडवून आणत असतात. ह्या वयात त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व दिसू लागते. ही अवस्था दहाव्या वर्षापासून सुरू होते आणि सोळाव्या वर्षापर्यंत पूर्ण होते.
या वयात प्रत्येक विषयावर आपले विचार व्यक्त करणे आणि शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल कुतूहल निर्माण होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांना त्याची उत्तरे आई-वडिलांकडून हवी असतात परंतु त्यांचे समाधान कसे करायचे याचा फार मोठा प्रश्न आई-वडिलांसमोर असतो.
- मुलाचा जन्म कसा होतो ?
- मुल कुठून येतं ?
- माझा भाऊ, बहीण कुठून आले ?
- पाळी म्हणजे काय ?
- मुलांना पाळी का येत नाही ?
- लग्न कशासाठी करतात ?
- गर्भपात म्हणजे काय ?
- विवाहपूर्वी देखील मुलं होऊ शकतात का ? ……..
असे अनेक प्रश्न किशोरवयीन मुलांच्या मनात डोकावत असतात.
पण याची योग्य उत्तरे न मिळता आई-वडील उडवा उडवीची उत्तरे देतात. विषय बदलणे, दमदाखी करून मुलांना चूप करणे, मोठे झाल्यावर तुला कळेल असे उत्तर देऊन वेळ मारून नेणे, हे सर्व प्रकार चुकीचे आहेत.
उलट मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या वयाला अनुसरून उत्तर देणे आवश्यक असते.
“प्रत्येकाच्या आयुष्यात हा टप्पा येत असतो. आम्ही सुद्धा या स्थितीतून गेलो आहोत”, हे आपण आपल्या मुलांना सांगितल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड तसेच जनरेशन गॅप मुळे होणारा दुराव दुरावा आपण कमी करू शकतो.
किशोर वयाच्या नाजूक अवस्थेतून जाणारी हे मुलं, आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी अज्ञानी असतात. शिवाय शिक्षणात “करिअर” घडविण्याचा दबावही त्यांच्यावर असतो. अशा अवस्थेत त्यांच्या मनात तयार होणाऱ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे जेव्हा त्यांना आई-वडिलांकडून मिळत नाहीत, तेव्हा कुतूहलापोटी ते या प्रश्नांची उत्तरे दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतात. पण या मार्गाने त्यांच्या ज्ञानात भर पडण्याऐवजी त्यांना चुकीच्या मार्गावर उत्तरे मिळत असतात.
यासाठी आई-वडिलांनी खुल्या मानाने आणि नि:संकोच चर्चा करण्यास तयार राहायला हवे. मुल असे प्रश्न का विचारते यापेक्षा मुलांच्या मनात हे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे असा विचार करायला हवा, तरच आपण मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतो.
मुलांना मार्गदर्शन कसे करावे ?
• आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी त्यांच्या वागणुकीवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधावा आणि त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करावा.
•• शरीरात होणाऱ्या संप्रेरकांच्या बदलांमुळे याविषयी मनात जिज्ञासा निर्माण होते. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. भिन्न लिंगी आकर्षण निर्माण होते. ही वयानुरूप सामान्य बाब आहे.
•••मुलगी वयात आल्यानंतर तिच्यावर बंधन घालणे म्हणजे आपण तिची फार काळजी घेतो हा समोर चुकीचा आहे. परंतु तिला एका मैत्रिणीसारखी समुपदेशनाची गरज असते. यातून परावृत्त होण्यासाठी सारखा अभ्यासाचा तकादामागे न लावता मुलांना निखळ मनोरंजन आणि खेळ यांचा पुरेपूर आनंद घेऊ द्यावा. त्यामुळे अशा विचारांपासून मुलांना आपल्या जीवनाचे लक्ष, ध्येय निश्चित करण्यासाठी होईल.
मुलांच्या या किशोर वयातील समस्येवर, त्यांचा स्वभाव, त्यांची प्रकृती, घरातील वातावरण इत्यादींचा अभ्यास करून विविध होमिओपॅथीक औषधे देता येतात. या औषधांनी मुलांचे मानसिक संतुलन सुधारतं व त्यांच्या भावनिक व वागणुकीतील समस्यांमध्ये ही सुधारणा होते. त्यात मुलांची एकाग्रता व स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावतो.
म्हणून पालकांनी मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे, समुपदेशन व होमिओपॅथीक औषधे नियमित सुरू ठेवणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे.