वर्तन दोष व होमिओपॅथी
दर्शीलला घेऊन त्याची आई वडील माझ्या दवाखान्यात आले. जेव्हा ते आले तेव्हा दवाखान्यात त्यांचा चेहरा पाहताच लक्षात आले की, ते चांगलेच वैतागलेले आहेत. “आम्ही दोघांनीही याच्यापुढे हात टेकले आहेत. अगदी कंटाळून गेलो आहोत याच्या या नेहमीच्याच त्रासाला. अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी करायला याला जमतात.”
अगदी वैतागून त्याची आई सांगत होती. आणि वडील ही डोक्याला हात लावून बसले होते.
दर्शील सातव्या इयत्तेत शिकत होता. घरामध्ये आजी-आजोबा आणि लहान बहीण. घरात लहानपणापासूनच दर्शील थोडा खोडकर स्वभावाचा होता. सुरुवातीला पहिला मुलगा !
“मुलांनी खोड्या नाही करायच्या तर मग कोणी करायच्या ?” असे म्हणून त्याच्या वागण्याचं कौतुक जास्त झालं. आजोबांचा लाडका नातू, त्यामुळे मागील त्या वस्तू मिळायच्या. कोणी त्याला रागवायचे नाही. पुढे पुढे मात्र त्याचा खोडकरपणा खूपच वाढायला लागला.
तो समजावून सांगितल्यानंतर ऐकत नसे. थोडी जरी मनाविरुद्ध गोष्ट झाली किंवा कुठलीही गोष्ट मागितल्यास पटकन नाही दिली किंवा थोडा जरी उशीर झाला किंवा कोणतीही गोष्ट नंतर देतो म्हटलं तरी तो आक्रस्ताळेपणा करायचा. इतका की, तो आरडाओरोड करायचा, वस्तूंची फेकाफेक करणे, गडाबडा लोळणे, केस ओढणे, आईला मारणे, आजीला मारणे अशा एक ना अनेक वागण्याच्या तऱ्हा असायच्या.
एक दोन दिवस झाले की त्याची काहीतरी मागणी असायची. स्वतः जवळ असलेल्या गोष्टी जुन्या झाल्या म्हणून नवीन पाहिजे असे म्हणून परत मागायचा. घरातल्या व्यक्तींबरोबर त्याच्या तक्रारी होत्या. पुढे बाहेरूनही नेहमी तक्रारी वाढायला लागल्या.
नेहमी मित्रांशी काहीतरी भांडण व्हायचे. त्यांना मारायचे. त्यांच्या खोड्या काढायच्या. त्यामुळे खेळायला त्याला कोणी घेत नसे. शेजाऱ्यांनी किंवा इतरांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उलट बोलणे, उद्धटपणे बोलणे, असे करायला लागला.
लहान बहिणीला तर जाता येता तिला मारणे, तिच्या खोड्या काढणे, तिच्या सगळ्या वस्तू लपवून ठेवणे, पेन्सिल रबर मोडून टाकून देणे, अशा प्रकारे लहान बहिणीला ही त्रास द्यायचा.
दुसऱ्यांना त्रास देण्यात त्याला एक प्रकारचा आनंद मिळत असे. एकदा आईने पाहिले की घराच्या दरवाजातून मुंग्या मारत बसला होता किंवा घरात असलेले मुंगळे, अंगणातले गांडूळ किंवा छोटे छोटे किडे यांना तो दगडाने ठेचून मारत असे. इतर प्राण्यांना ही तो विनाकारण दगड मारायचा त्यांना दगड लागला की तो मोठमोठ्याने हसणं असं असायचं ! असुरी आनंद मिळायचा !
आई-वडिलांनी प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी दर्शीलमध्ये काही फरक पडत नव्हता. उलट त्याच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या. काही वेळा वडिलांनी चांगलंच मारलं, पण जेव्हा मार बसायचं तेवढ्यापुरता गप्प बसायचं. दुसऱ्या दिवशी परत येणे माझ्या मागल्या. नंतर नंतर तो मारालाही घाबरेनासा झाला. “मारा मला ” म्हणून अगदी निगरगट्टपणे उभे राहायचा.
शाळेतूनही तक्रारी यायला लागल्या. वर्गातसुद्धा मुलांशी तो नीट वागत नव्हता. त्यामुळे शाळेतूनही त्याला काढून हॉस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला. सहावीत असताना त्याला हॉस्टेलवर ठेवण्यात आलं होतं. तेथे तर वागण्यात फरक पडण्याऐवजी तो जास्तच उद्धट झाला. हॉस्टेलवरूनही तो दोन वेळा पळून घरी आला. तेथील नियमही तो नेहमीच मोडत असे. भांडण काढायचा, मारामारी करायचा शेवटी हॉस्टेलच्या संचालकांनी त्याला घरी नेण्याचा सल्ला दिला.
अलीकडे तर तो आईचे अजिबात ऐकतही नसे किंवा तिला वारंवार ब्लॅकमेल करणे म्हणजे मला गेम आणायला आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर मी ही टीव्ही फोडेण असं म्हणत तो हातात हातोडा घेऊन उभा असे. नाईलाजास्तव आईला त्या गोष्टीसाठी त्याला पैसे द्यावे लागायचे. एकदा तर त्याने वडिलांच्या खिशातले पाचशे रुपये चोरले हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मात्र त्यांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी “चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक” मध्ये होमिओपॅथिक औषधोउपचार करण्याचा सल्ला दिला.
दर्शीलशी बोलल्यावर त्यांने सर्व कबूल केले, पण आपण काही चूक केली आहे याबद्दल कोणतीही अपराधीपणाची भावना त्याच्या मनात नव्हती. उलट तो आपल्या आई-वडिलांनाच दोष देत होता.
दर्शीलला वर्तनदोषाचा (बिहेवियर डिसऑर्डरचा -Behavior Disorder) आजार झाला होता.
तो कोणतेही सामाजिक, कौटुंबिक नियम पाळण्याच्या विरुद्ध होता. इतरांबद्दल आदर किंवा कणव वाटत नसे. उलट इतरांना त्रास देण्यात त्याला विकृत आनंद मिळत असे. अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करीत राहिले तर ही मुले पुढे समाजविरोधी कृत्यांमध्ये भाग घेण्याची शक्यता असते व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते.
मुलांच्या हट्टाची अशी असंख्य उदाहरणे आपल्या रोजच्या परिचयाची आहेत. मुलांचा हट्टही दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करणारी ज्वलंत समस्या बनली आहे. काळ झपाट्याने बदलतोय. मुलांच्या सभोवतालची सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक परिस्थिती बदलते आहे. मुलांच्या अशा वागण्याबाबत काय करावं याबाबत पालकांचा गोंधळ आणखीनच वाढतोय. अशावेळी पालकांच्या मनात या समस्येबद्दल एक ठाम आणि स्पष्ट भूमिका असणे गरजेचे आहे. त्यासाठी या समस्ये मागची काही कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.
हल्ली कुटुंब छोटी छोटी होत आहेत. आई वडील दोघेही कामात व्यस्त असतात.
1) मुलांसाठी आपण वेळ देऊ शकत नाहीत. या अपराधी भावनेतून मुलांवर खेळणी, खाऊ, बक्षीसांचा वर्षाव होतो.
2) हल्ली घरात एक मुल आणि लाड करणारे अनेक, त्यामुळे मुलांना अजिबात रडवायचे नाही या भावनेतून त्यांच्या मनासारखी प्रत्येक गोष्टी घडवून आणली जाते.
3) बऱ्याच वेळा आर्थिक सुबत्तेतून एखादी गोष्ट परवडते मग ‘का नाही म्हणायचं’ ? त्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे मुलांना न मागितलेल्या, त्यांना गरज नसलेल्याही गोष्टी मिळत आहेत.
त्यामुळे कोणतेही नवीन आकर्षक, वेगळी दिसणारी गोष्ट बाजारात आली की ती आपल्याकडे हवीच ! (मग गरज असो वा नसो) , असा मुलांचा हट्ट असतो. किंवा नव्या फॅशनचा ड्रेस, नवं खेळणं आधी आपल्याच मुलाकडे दिसावं असा पालकांचा अट्टाहास असतो. त्यामुळे मुलांकडे असंख्य गोष्टी असतात, ज्याची मुलांना अजिबात किंमत उरत नाही.
4) आपलं बालपण कष्टात गेलं, मग आपल्या मुलांना तरी मन मारून जगाला लागू नये या भावनेतून बरेच पालक लाड करतात.
पण या सगळ्यांमुळे मुलांना नकार पचवण्याची शिकवण दिली जात नाही. तर ‘पाहिजे ते मिळण्याची’ मुलांना इतकी सवय झाली आहे की, एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहण्याकरीता, कष्ट करून ती गोष्ट मिळविण्याकरता लागणारा संयमच मुलांच्याच राहिलेला नाही.
मुलांमध्ये / मुलींमध्येही अधीरता आली आहे. एखादी वस्तू न मिळाल्यास तो किंवा ती आक्रमक होत आहेत. अगदी मोठेपणी ‘वडिलांनी मोबाईल दिला नाही’ म्हणून चोरी करणं, एखाद्या मुलीने नकार दिला म्हणून तिला पेटवणं, इथपर्यंत त्याची दूरगामी परिणाम आपल्याला दिसत आहेत.
काही वेळा काही पालक मुलांच्या मागण्यांना नाही म्हणण्याचा प्रयत्न करतातही, पण अशावेळी मुलं रडून आकांडतांडव करून आई-वडिलांचा जीव नकोसा करून सोडतात. त्यांच्या आक्रस्ताळेपणाला घाबरून, घरातील मोठी मंडळी मुलांची हट्ट पुरवतात. त्यातील, युक्ती करून मग मुलं बरोबर एखाद्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या समोर हट्ट करतात आणि चारचौघात शोभा नको म्हणून मग पालक गुपचूप मुलांना हवं ते देऊन टाकतात. मुलांच्या अशा वागण्याला जणू प्रोत्साहनच मिळतं.
लहानपणाचे हे हट्ट मोठेपणी राक्षसी रूप धारण करतात तेव्हा पालकांना आपली चूक उमगते. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून मुलांना लहानपणापासून नकार पचवायला शिकवणे अत्यंत गरजेचे आहे.
मुलांच्या आक्रस्ताळेपणाला न घाबरता, त्यांच्या भावना समजून घेणं, पण त्यांना ठामपणे ‘ नाही’ म्हणणे या तीनही गोष्टीचे संतुलन पालकांनी साधनं फार गरजेचं असतं.
मुलांच्या या समस्येवर वेळीच मार्गदर्शन व उपचार न केल्यास कधी कधी ही समस्या मानसिक आजाराचे ही रूप धारण करू शकते, जसे दर्शील या मुलाचे उदाहरण द्या.
या मुलांना वाढवीताना पालकांच्या नकळत झालेल्या चुका, योग्य त्या संवादाचा अभाव, घरातील वडीलधाऱ्या मंडळींमध्ये तणाव, अशा गोष्टी या प्रवृत्तीला खत पाणी घालू शकतात. योग्य वेळी जरका लक्ष पुरविले तर त्यामध्ये बदल घडविणे शक्य आहे. त्यासाठी आपल्या मुलाच्या खोड्यांना कुठपर्यंत पाठीशी घालायचे हे पालकांना समजायला हवे.
अशा प्रकारच्या आजारांचा उपचार करताना पालक व डॉक्टर दोघांनी संयम बाळगून काम करावे लागते.
होमिओपॅथिक औषधांची उपचारांमुळे मुलांची आक्रमकता कमी होते. त्यांचं मानसिक संतुलन सुधारून वागण्यात बराच फरक पडतो.आक्रस्ताळेपणा कमी होऊन ही मुलं बऱ्याच प्रमाणात शांत होतात.
परंतु होमिओपॅथिक औषधांबरोबरच कुटुंबातील सर्व व्यक्तींचा सहभाग आवश्यक ठरतो.
कुटुंबातील सर्वांनी नियम बनवून काटेकरूपणे पालन करणे,
मुलांशी योग्य संवाद करणे,
त्यांच्या चुकीच्या वागण्याची लगेच जाणीव करून देणे,
चांगल्या वर्तनाची दखल घेऊन प्रोत्साहन देणे, इत्यादी गोष्टी सातत्याने करणे गरजेचे आहे.
होमिओपॅथीमध्ये या समस्येवर अनेक चांगले औषधी असून त्यांचे मुलांवर चांगले परिणाम होऊन सकारात्मक बदल होतात. त्यांच्या आनंदाच्या चुकीच्या कल्पना बदलून योग्य पद्धतीने राहण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होता. त्यांची व्यक्तिमत्व सहृदयी व समाजशील बनविण्याची हा शक्ती नक्कीच होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे !!